रत्नागिरी, 3 डिसेंबर, (हिं. स.) : राजकारणाकडे तुम्ही कसे बघता, त्यावर तुमची नैतिकता अवलंबून आहे. अलीकडच्या काळात राजकारण हा शो बिझनेस झाला आहे. त्याला धंदा आणि व्यवहाराचे स्वरूप आले आहे. काहीतरी मिळवण्यासाठी राजकीय पक्षात गेले पाहिजे अशी मानसिकता सर्वसामान्य माणसांमध्ये निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘राजकारणातील नैतिकता’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादात कानगो यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, संपत देसाई सहभागी झाले होते. कॉम्रेड आर. बी. मोरे विचार मंचावर झालेल्या या परिसंवादाचे अध्यक्षपद विजय चोरमारे यांनी भूषविले.
कानगो पुढे म्हणाले की, अलीकडचे राजकारणी राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता अशा दुष्टचक्रात अडकले आहेत. राजकारणाकडे तुम्ही साधन म्हणून बघता की साध्य म्हणून, त्यावर तुमची राजकीय नैतिकता अवलंबून आहे. अलीकडच्या काळात प्रत्येकजण आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. विकास आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध आहे. समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन हा त्याचाच एक भाग आहे. जनतेला जात, धर्म, भाषा, प्रांत या प्रश्नांवर भडकवले जाते; मात्र डाव्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आजही जनतेचे प्रश्न घेऊन संघर्ष करण्याची भूमिका घेतात. कारण आज नैतिकता फक्त त्यांच्याकडेच शिल्लक आहे. आपल्याला जे अनैतिक वाटते त्यावर प्रगतिशील लेखक संघाचे लेखक, कवींनी भाष्य आवाहन कानगो यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
