नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : चीनशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने एलएसीवर मँडरीन (चीनी भाषा) बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलीय. भारत-चीन वाद सोडवण्यास मदत व्हावी या हेतूने या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीय.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात 5 अधिकाऱ्यांना प्रादेशिक सैन्यात सहभागी करण्यात आले आहे. मँडरीन भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याने आणि इतर आवश्यक मानकांची पूर्तता केल्यानंतर त्यांची नेमणूक करण्यात आलीय. मँडरीन बोलण्यात पटाईत असलेल्या या 5 अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सोपी नव्हती. उमेदवारांना अनेक फेऱ्यांतून जावे लागले. जानेवारीत पहिली फेरी सुरू झाली आणि काही महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये मँडरीन भाषेवर प्रभुत्व असलेल्या विविध उमेदवारांना आधी लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखत द्यावी लागत होती. हे अधिकारी सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सोबतच्या बैठकीत मदत करण्यासाठी फॉरवर्ड पोस्टवर राहतील. या 5 अधिकाऱ्यांना लडाखमधील फॉरवर्ड बेसवर तैनात करण्यात आले आहे. भारत-चीन सीमा बैठकीदरम्यान ते भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान द्विभाषिक (दोन भाषा जाणणारा) भूमिका बजावणार आहे. पण, सीमेवर होणाऱ्या बैठकांव्यतिरिक्त त्यांना इतर कामांमध्येही तैनात केले जाऊ शकते.
