श्रीहरीकोटा, २१ ऑक्टोबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) महत्वाकांक्षी गगनयान मिशनचे उड्डाण अखेरच्या क्षणी रद्द झाले. गगनयान उड्डाणासाठी सज्ज होते. मात्र फक्त पाच सेकंद शिल्लक असताना यंत्रणा ‘होल्ड’वर गेली. त्यानंतर इस्रोकडून या उड्डाण चाचणीला ‘अबॉर्ट टेस्ट’ नाव देण्यात आले आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अतंराळ केंद्रातून गगनयानच्या क्रू मॉड्यूल उड्डाण होणार होते. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यावेळी इंजिनमधील इंधनाने पेट न घेतल्याने गगनयानचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यातील त्रुटींचा अभ्यास करून ही मोहिम पुन्हा लवकरच यशस्वी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पूर्व नियोजित वेळेनुसार सकाळी ८ वाजता हे उड्डाण केले जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे काही वेळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. सुधारित वेळेनुसार ८.४५ वाजताच्या सुमारास पुन्हा उड्डाण करण्याचे नियोजित होते. त्याप्रमाणे काऊंटडाऊन सुरू होते. मात्र शेवटची पाच सेकंद राहिली असता मिशन रद्द करण्यात आले.
या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेले जाणार होते. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाणार होते. इस्रोसाठी आजचा दिवस खूप खास आहे. एखाद्या अंतराळ मोहिमेदरम्यान रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम (Crew Escape System) चाचणीचा यात अंतर्भाव होता.
