राजधानीत सोमवारी एक्यूआय 900च्या पुढे
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा प्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठली आहे. दिल्लीत आज, सोमवारी एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) 900च्या वर गेलाय. दिल्लीत पावसामुळे प्रदूषण नियंत्रणात आले होते. परंतु, शहरात लागलेल्या छोट्या-मोठ्या 100 आगी आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे पुन्हा एका प्रदूषण वाढले आहे.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता 7 वर्षांनंतर दिवाळीला सर्वोत्तम होती. रविवारी (12 नोव्हेंबर) दिल्लीत एक्यूआय 202 ची नोंद झाली. यापूर्वी, 2022 च्या दिवाळीला दिल्लीत एक्यूआय 312, 2021 मध्ये 382, 2020 मध्ये 414, 2020 मध्ये 337, 2019 मध्ये 337, 2018 मध्ये 281, 2017 मध्ये 319 आणि 2016 मध्ये 431 नोंदवले गेले होते. दिल्लीत 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या पावसानंतर प्रदूषणात 50 टक्क्यांनी घट झाली होती. पर्यायाने 11-12 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील एक्यूआय 250 पेक्षा कमी होता.
दरम्यान दिवाळीच्या रात्री दिल्लीत आगीच्या सुमारे 100 घटनांची नोंद झाली. दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी 6 ते 10.45 या वेळेत आगीच्या घटनांबाबत 100 कॉल रेकॉर्ड करण्यात आले. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दल रात्रभर अलर्ट मोडवर होते. त्यासोबतच शहराच्या अनेक भागात नियमांचे उल्लंघन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे पावसाने कमी झालेल्या प्रदूषणात वाढ होऊन राजधानीत काळ्या धुक्याची चादर पसरली आहे.
