नवी दिल्ली, 31 जानेवारी :नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाची 31 डिसेंबर 2023 रोजी स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पुढील सदस्यांची आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 15 व्या वित्त आयोगाचे माजी सदस्य तथा माजी व्यय सचिव अजय नारायण झा, माजी विशेष सचिव (व्यय) ॲनी जॉर्ज मॅथ्यू, अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष हे पूर्णवेळ सदस्य असतील, तसेच भारतीय स्टेट बँक समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष या अर्धवेळ सदस्या असणार आहेत.
आयोगाच्या कार्यविषयक संदर्भ अटी 31 डिसेंबर 2023 रोजी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. सोळाव्या वित्त आयोगाला 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या शिफारशी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
