बीड, २३ डिसेंबर (हिं.स.) : राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय. या पार्श्वभूमीवर २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार, अशी घोषणा मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. त्यांनी म्हटले की, राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हाला सुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे, असे आवाहन त्यांनी मराठा समाज कार्यकर्त्यांना केले.
तीन कोटी मराठे मुंबईत येणार!
मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करू नये. कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करू द्यायची नाही. तीन कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही. मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर आरक्षण घेऊनच मागे फिरणार.
सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी!
सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहनही त्यांनी केले. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही.
…तर यापुढे ‘त्या’ नेत्यांना दारातही उभे करू नका!
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारीपर्यंत नोटिसा दिल्या आहेत. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका. आतापर्यंत मराठ्यांच्या जीवावर हे आमदार, खासदार झाले, पण मराठा आरक्षणाच्या विषयावर किती जण पुढे आले. आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे साथ देणार नाहीत त्या आमदारांना दारातही उभा करू नका. जो मराठा आरक्षणासाठी लढेल तो आपला, असेही ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
