नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांची आज, सोमवारी ईडीतर्फे चौकशी करण्यात आली. वैभव गेहलोत मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. वैभव यांच्यावर ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट एक्ट’च्या (फेमा) उल्लंघनाचा आरोप आहे.
राजस्थानमधील पेपर लीक प्रकरणी नुकतेच ईडीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरावर छापा टाकला होता. यासोबतच ईडीने फेमा प्रकरणी वैभव गेहलोत यांना समन्स बजावले होते. वैभव गहलोत यांच्या कंपनीवर शेल कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप आहे. याबाबत भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती. वैभव गेहलोत यांनी मॉरिशसच्या एका कंपनीच्या माध्यमातून हॉटेलमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप किरोडीलाल मीणा यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व भाजप करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान दिल्लीत ईडीसमोर हजेरीनंतर वैभव गेहलोत म्हणाले की, फेमा प्रकरणात ईडीने मला प्रश्न विचारले आणि मी सांगितले की, माझा आणि माझ्या कुटुंबाचा फेमाशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणताही परदेशी व्यवहार केला नसल्याचे वैभव यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
