
नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.)। वाढत्या उष्णतेच्या आणि दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने ‘एक्सपेरिमेंटल हीट इंडेक्स’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या इंडेक्समुळे केवळ तापमानावर आधारित अंदाज न देता, हवेत असलेल्या आर्द्रतेचाही विचार करून माणसाला प्रत्यक्षात किती उकाडा जाणवतो याचे अधिक वास्तव चित्र समोर येणार आहे.
साधारणपणे हवामानातील तापमान मोजताना फक्त सेल्सिअस डिग्रीत नोंद केली जाते, मात्र अनेकदा लोकांना जाणवणारी उष्णता ही अधिक असते. याचे मुख्य कारण म्हणजे हवेत असलेली आर्द्रता. त्यामुळेच आयएमडीने हा नवीन हीट इंडेक्स सादर केला असून, तो तापमान आणि सापेक्ष आर्द्रता ( रेलॅटिव्ह ह्यूमिडिटी) या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार करून ‘फील्स-लाईक टेम्परेचर’ म्हणजेच जाणवणारे तापमान दर्शवतो.
हा इंडेक्स विशेषतः जास्त तापमानाच्या काळात अधिक उपयुक्त ठरणार आहे, कारण दमट हवेमुळे शरीराला उष्णतेचा त्रास अधिक होतो. त्यामुळे हा इंडेक्स नागरिकांना उष्णतेमुळे होणाऱ्या अस्वस्थतेबद्दल आगाऊ सूचना देईल आणि योग्य ती खबरदारी घेण्यास मदत करेल. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी हा निर्देशांक एक महत्त्वाचे साधन ठरू शकतो.
भारतामध्ये आतापर्यंत उष्णतेची लाट (हीटवेव्ह) ही ठराविक तापमान मर्यादा किंवा सरासरी तापमानापेक्षा झालेल्या विचलनाच्या आधारावर ठरवली जात होती. मात्र या पद्धतीत आर्द्रतेचा पुरेसा विचार केला जात नव्हता. त्यामुळे प्रत्यक्षात लोकांना होणारा त्रास अधिक असूनही अधिकृत आकडेवारी त्यापेक्षा कमी दिसत असे. या पार्श्वभूमीवर हा नवीन हीट इंडेक्स अधिक अचूक आणि वास्तवदर्शी ठरणार आहे.
आयएमडीचे हवामान अंदाज अधिकारी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, हे हीट इंडेक्स तापमानासोबत आर्द्रतेचा विचार करून उष्णतेचा मानवी शरीरावर होणारा खरा परिणाम दर्शवतो. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळणार आहे.
एकूणच, बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आयएमडीचा हा ‘एक्सपेरिमेंटल हीट इंडेक्स’ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यात हवामान अंदाज अधिक वैज्ञानिक आणि लोककेंद्रित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
