नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपच्या विरोधात समर्थन मिळाले नाही तरी फरक पडत नसल्याचे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी केलेय. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या अटक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आलीय. या कारवाईवरून आम आदमी पार्टी (आप) सातत्याने भाजपवर टीका करीत आहे. परंतु, आयएनडीए आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून आपला अपेक्षित समर्थन मिळाले नाही. यावरून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचे समर्थन मिळाल्याने काहीही फरक पडत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले आहे. संजय सिंह यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांना काँग्रेसकडून खुलेपणाने पाठिंबा मिळत नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. संजय सिंह यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांची चौकशी करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. केंद्र सरकार केवळ आरोप करते आणि तपास करते, पण काहीही सापडत नाही, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक गुन्हे नोंदवले, पण त्यांच्या चौकशीनंतर काहीही निष्पन्न झाले नाही. सर्व प्रकरणे खोटी आहेत. वेळेचा अपव्यय सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय ज्या प्रकारे मनीष सिसोदिया प्रकरणाबाबत प्रश्न विचारले होते, त्यावरून ते प्रकरण खोटे असल्याचे दिसून येते. खोट्या प्रकरणांच्या तपासात सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांसह सर्वांचा वेळ वाया जातो. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. कोणावरही खोट्या केसेस लादल्याने देशाची प्रगती होणार नाही, या शब्दांत केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.
हिंदुस्थान समाचार
