कोलकाता, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : बंगालच्या उपसागरात हमून नावाचे नवे चक्रीवादळ तयार झाले. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या खोल दाबाचे क्षेत्रामुळे आज, सोमवारी हे चक्रीवादळ तयार जाले. या चक्रीवादळाला इराणने हमून हे नाव दिले आहे.
चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता किनारी भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आता हळूहळू उत्तर आणि ईशान्येकडे सरकेल. आगामी 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या सुमारास बांगलादेशातील खेपुपारा आणि चितगावदरम्यान बांगलादेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे आणि प्रशासनाला अतिवृष्टी झाल्यास सखल भागातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हमून चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 200 किमी समुद्रात सरकणार आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या 2 दिवसांत किनारी ओडिशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितले की, केओंझार, मयूरभंज आणि ढेंकनाल व्यतिरिक्त उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संसाधन विकास विभागाने मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर, कोलकाता आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हिंदुस्थान समाचार
