* चार गटांमध्ये 16 संघांमध्ये चुरस * विक्रोळीतील (मुंबई) डॉन बॉस्को हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश
नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.) – प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 21 आणि 22 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल क्रीडांगणावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय संगीत आणि सुरावटींना लोकप्रिय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात प्रत्येक विभागांमधून प्रत्येकी चार (पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर) असे एकूण 16 बँड संघ आपले संगीत कौशल्य प्रदर्शित करत परस्परांशी स्पर्धा करतील. ही स्पर्धा चार प्रकारात ( मुलांचा ब्रास बँड, मुलींचा ब्रास बँड, मुलांचा पाईप बँड आणि मुलींचा पाइप बँड) होणार आहे. महाराष्ट्रामधून मुंबईतल्या डॉन बॉस्को प्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ या अंतिम फेरीतील 16 संघांमध्ये समाविष्ट आहे.
प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (पहिले – 21,000 रुपये, द्वितीय – 16,000 रुपये तर तृतीय – 11,000 रुपये), एक करंडक, तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रोत्साहनपर प्रत्येकी 3,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. या महाअंतिम सोहळ्यासाठी ज्युरी अर्थात परीक्षकांची निवड संरक्षण मंत्रालयाद्वारे केली जाईल आणि यामध्ये सशस्त्र दलाच्या प्रत्येक विभागातील सदस्याचा समावेश असेल.
ही स्पर्धा तीन स्तरांवर राज्य, विभागीय आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे सर्व शाळांसाठी (सीबीएसई,आयसीएसई, केव्हीएस, एनव्हीएस आणि सैनिकी शाळा इ.) आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत 12,857 मुलांचा समावेश असलेल्या 486 संघांनी भाग घेतला, तर विभागीय स्तरावर 2,002 मुलांचा समावेश असलेल्या 73 संघांनी भाग घेतला. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना जागृत करणे आणि त्यांना सर्वांगीण शिक्षणाच्या मार्गावर प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हिंदुस्थान समाचार
