पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे आणि अमरावती येथून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री एनआयएने छापेमारी केली. तर पुण्यातील गुलटेकडी परिसरातही छापा टाकला.
पुण्यातून एनआयने १९ वर्षीय साफवान शेख या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरु आहे. पुलगेटच्या अरिहंत काॅलेजचा हा विद्यार्थी आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. साफवान बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याने चौकशी सुरु आहे. तसेच अमरावतीमध्येही एनआयएने कारवाई केली आहे. एका शिक्षकाच्या मुलाला एनआयने ताब्यात घेतले आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला असावा असा संशय आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई, पुणे आणि राज्यभरात एनआयएच्या छापेमारीनंतर आज पुण्यात पुन्हा छापेमारी केली जात आहे. 18 मे रोजी पुण्यातील कोथरूड भागात दोन अतिरेकी पकडल्यानंतर गेल्या आठवड्यात 15 दहशतवाद्यांना ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले होते. आज पुन्हा सकाळपासून पुण्यात एनआयएकडून छापेमारी सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
