कुलगामच्या सामनू येथे जोरदार धुमश्चक्री
श्रीनगर, 16 नोव्हेंबर (हिं.स.) : दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील सामनू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी घेरले आहे. याठिकाणी 3 ते 5 दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कराची 34 आरआर बटालियन आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने एका विशिष्ट माहितीवरून कुलगामच्या सामनू गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. नाकाबंदी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमक सुरू झाली आहे. घटनास्थळी 3 ते 5 दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर काश्मीरमधील बारामुले जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत दहशतवादी लाँच कमांडर बशीर अहमद मलिकसह दोन दहशतवादी मारले गेले. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि पाकिस्तानी रोकड जप्त करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
