नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील चौकी कान्होलीबारा येथे शुभारंभ
नागपूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील चौकी कान्होलीबारा येथे उद्या रविवारी 26 नोव्हेंबर रोजी देशातील सर्वात मोठ्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. एकाच दगडातून घडवलेल्या या मूर्तीची उंची 15 फूट 5 इंच असून वजन 17 टन असल्याची माहिती आर्यभट्ट गुरूकुलम संस्थेचे आचार्य भूपेश गाडगे यांनी आज, शनिवारी ही दिली.
याबाबत गाडगे यांनी सांगितले की, कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 11 वाजता एकाच अखंड पाषाणातील सर्वात मोठ्या विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. शनी शक्तीपीठ परिसरात उभारलेल्या व्यासपीठावर प्राणप्रतिष्ठा होईल. नागपूरपासून 44 किलोमीटर अंतरावरील चौकी कान्होलीबारा येथे राज्यातील एकमेव आणि देशातील दुसरे बृहस्पती मंदिर आहे. अशा प्रकारच्या भव्य मूर्ती पाषाणासोबतच फायबर, सिमेंट व धातूपासून तयार केल्या जातात. शेगाव येथे फायबरपासून निर्मित 18 फूटांची विठ्ठल मूर्ती आहे. पण, एकाच अखंड सॅण्डस्टोनमध्ये घडवलेली 15 फूट 5 इंच उंचीची ही एकमेव विठ्ठल मूर्ती असून या मूर्तीचे वजन 17 टन असल्याचे गाडगे यांनी सांगितले.
ओडिशाच्या भूवनेश्वर येथील ख्यातनाम शिल्पकार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ महापात्रा यांच्या यांच्या आर्ट ॲन्ड क्राफ्ट फाउंडेशनद्वारे सॅण्डस्टोनमध्ये ही मूर्ती घडवली आहे. ही मूर्ती घडवण्यात त्यांना 8 महिने लागले. त्यावर 38 लाख रूपये खर्च आला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सुमारे 6 हजार भाविक येतील असा अंदाज आहे. या महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन पूजा गाडगे, डॉ. अनिल वैद्य, रामदास फुलझेले महाराज, देवेंद्र डायरे, रमेश मिश्रा, किशोर पौनीकर यांनी केले आहे.
चौकी कान्होलीबाराच्या रम्य परिसरात विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या 5 फूट उंच मूर्ती तसेच आर्यभट्ट, नागार्जुन, चरक इत्यादी 10 महान भारतीय संशोधनकर्त्यांच्या मूर्ती येथे स्थापित करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे श्रीक्षेत्र चौकी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एकमेव बृहस्पती मंदिर असून या परिसरात श्रीशनी शक्तिपीठ व आर्यभट्ट गुरुकुलमची स्थापना जून 2019 मध्ये करण्यात आली व येथे भारतातील सर्वात मोठे सूर्य घड्याळ (सन डायल), वार यंत्र, सर्वात मोठे श्रीयंत्र आणि व्हिएनआयटी नागपूरद्वारा स्वयंचलित केलेले भारतातील सर्वप्रथम तिथी व नक्षत्र यंत्र निर्माण करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
