हैदराबाद, 30 नोव्हेंबर (हिं.स.) : तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज, गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालीय. तेलंगणापूर्वी छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठी मतदान झाले आहे. या सर्व 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 2,290 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री केसीआर, त्यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजप लोकसभा सदस्य बी संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात 35 हजार 655 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून तेथे एकूण 3.26 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. राज्यातील 106 मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत आणि उर्वरित 13 मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 यादरम्यान मतदान होणार आहे. राज्यातील सत्ताधारी भारत राज्य समितीने (बीआरएस) सर्व 119 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर, भाजप स्वतः जागावाटप करारानुसार 111 जागांवर निवडणूक लढवत आहे, उर्वरित 8 जागा अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेनेसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसने आपल्या मित्रपक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला (सीपीआय) एक जागा दिली आहे आणि उर्वरित 118 जागांवर निवडणूक लढवत आहे.तेलंगणात मुख्य लढत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
