नागपूर,02 नोव्हेंबर (हिं.स.) : ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या (एआय) वापरातून तयार केलेला ‘डीपफेक’ हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबतच लोकशाही आणि समाजासाठी मोठा धोका असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. तसेच राष्ट्रपतींनी आवाहन केले की, नव्या पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाल्या की, नवी पिढी तंत्रज्ञानस्नेही आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करते. तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि सदुपयोगही करता येतो. नव्या पिढीने तंत्रज्ञानाचा सदुपयोग करावा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. माजी विद्यार्थी आपल्या मूळ संस्थेशी भावनात्मकदृष्ट्या जोडलेले असतात. हे लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनीही संस्थेची प्रगती आणि भरभराटीसाठी त्यांचे सहकार्य घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विपरित परिस्थितीत न डगमगता ज्ञान आणि आत्मबळावर सामना करावा. औपचारिक डिग्री नंतरही विद्यार्थ्यांनी शिकत राहिले पाहिजे असा कानमंत्रही राष्ट्रपतींनी यावेळी दिला.
यावेळी प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरींनी सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले असून हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या हिवाळी 2022 व उन्हाळी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या विविध विद्याशाखेतील परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. परीक्षेमध्ये स्पृहणीय यशबद्दल विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात विद्या शाखा निहाय 129 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी नितीन गडकरी यांनी ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे हेच भविष्य असल्याचे सांगितले. नवनवीन आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकेल अशी गुणात्मक मानव संसाधन निर्मिती हे विद्यापीठासमोर मोठे आव्हान आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
