हेमंत सोरेन यांच्या उत्तरांनी ईडी असमाधानी
मुख्यमंत्र्यांची ईडीकडून फेरचौकशी होऊ शकते
रांची, 20 जानेवारी (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, शनिवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तब्बल 7 तास चौकशी केली. सोरेन यांना ईडीने 8 वेळा समन्स बजावल्यानंतर त्यांनी ईडीच्या टीमला आपल्या निवासस्थानी बोलावले होते.
ईडीचे पथक दुपारी 1 वाजेच्या सुमाराला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर रात्री 8 वाजेच्या सुमाराला ईडीचे पथक रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांचीही तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर डीसी, एसएसपी यांच्यासह मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. ईडीने बडगई परिसरातील डीएव्ही बरियातूच्या मागे असलेल्या ८.४६ एकर जमिनीबाबत मुख्यमंत्र्यांची चौकशी केली. यावेळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबतही विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ईडीला यासंदर्भात दिली. आता ईडी त्याची जुळवाजुळव करेल. मात्र, आज झालेल्या चौकशीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांनी ईडीचे पथक समाधानी नाही. अशा स्थितीत हेमंत सोरेन यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरू असताना शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीसी राहुल सिन्हा, एसएसपी चंदनकुमार सिन्हा, शहर एसपी राज कुमार मेहता यांच्यासह विशेष शाखेचे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेची सतत पाहणी करत होते. सुमारे 200 हून अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. विशेष शाखेचे अधिकारीही सद्यस्थितीवर लक्ष ठेवून होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार सीआरपीएफचे जवानही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ तैनात करण्यात आले होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ईडीच्या चौकशीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ विविध आदिवासी संघटनांच्या लोकांनी केलेल्या सुरक्षेच्या निषेधार्थ जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या 500 मीटर परिसरात कलम 144 लागू केले होते.
आम्ही कोणाला घाबरत नाही: मुख्यमंत्री
ईडीच्या चौकशीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन हसत हसत त्यांच्या निवासस्थानातून बाहेर आले आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते बाहेर येताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांनी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आम्ही कोणाला घाबरत नाही, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल, असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले. सरकार स्थापन झाल्यापासून आमच्या विरोधात षडयंत्र रचले जातेय. परंतु, आम्ही घाबरत नाही. प्रसंगी गोळ्या खाऊ पण झुकणार नाही असे सोरेन यांनी यावेळी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
