नवी दिल्ली, 7 ऑगस्ट (हिं.स.) – ट्रम्प आपल्या देशाची आणि नरेंद्र मोदींची अक्षरश: थट्टा करत आहेत आणि खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना जाब विचारायचं सोडाच, पण आपण त्यांना साधं उत्तर देखील देऊ शकत नाही. कारण या देशाचं सरकार चालवतंय कोण? आजचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री हे भाजपचे आहेत. कारण ते प्रचारामध्ये जातात. देशाचे पंतप्रधान असते तर ते पहलगामला गेले असते पण ते बिहारला गेले. हे सर्व भाजपचे प्रचारमंत्री आहेत. हे सरकार असफल, अपयशी आणि असाहाय्य आहे. त्यांची परराष्ट्रनीती अपयशी ठरली आहे. कोणतंही असं खंबीर धोरण नाही, अशी शब्दात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते दिल्ली दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले की, ‘ईव्हीएमवर संभ्रम असताना व्हीव्हीपॅट काढलं, मग निवडणूक घेता कशाला. कोण जिंकलं? कोण हरलं? थेट जाहीर करा. आमचं मत आम्हाला कळत नाही. रजिस्टर कुठे होतं हे कळत नाही. बॅलेट पेपरवर मतदान करताना ठसा लावल्यानंतर माझं मत कुठे आहे कळायचं. आता व्हीव्हीपॅट काढलं जात आहे. मग निवडणूक घेताच कशाला’, असा अचूक निशाणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधला.
प्रत्येक राज्याच्या निवडणुका वेळेनुसार होतील. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला आहे. स्वत:ची ओळख मतदारांनी पटवून द्यायची असं त्यात आहे. म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झाली आहे का? सीएए आणि एनआरसीवरुन विषय पेटला होता. दिल्लीत त्यावरुन आंदोलन देखील झालं होतं. तुम्ही तुमची ओळख पटवून द्या, असं म्हटलं होतं आणि त्यामुळे वाद झाला होता. आता निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर द्यावं, असं म्हणत ठाकरे यांनी आयोगाला लक्ष्य केले.
खासदार राहुल गांधी यांनी निमंत्रण दिले आणि इंडी आघाडीच्या नेत्यांसोबत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कोणकोणत्या विषयांवर चर्चा होते, हे पाहू. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काही रणनिती ठरू शकते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आले आहेत. यामुळे इंडी आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा होऊ शकते का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, यावर दिल्लीत चर्चेची आवश्यकता नाही आणि याबाबतीत महाराष्ट्रात आल्यावर बोलेन. इंडी आघाडीत अटीतटी नाही. राज आणि आम्ही निर्णय घेण्यात सक्षम आहोत. जे करायचं ते करु. त्यात तिसऱ्याची गरज नाही, असे सूचक वक्तव्य ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सरकारला नीतीमत्ता राहिली नाही. पाकिस्तान दुश्मन आहे. दिल्लीत आम्ही मॅच रोखली होती. मुंबईत रोखली होती. जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत मॅच खेळू नये हे आम्ही सांगोयचो. सुषमा स्वराज यांनीही म्हटलं होतं. हे मतलबी लोक आहे. आपल्याला धडे देतात. पण जय शहासकट मंत्र्यांची मुलं दुबईत जाऊन पाकिस्तानची मॅच पाहत आहेत. हे देशभक्त असूच शकत नाही. देशभक्तीची व्याख्या करायची असेल तर सच्चा देशभक्ताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नये, असे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावर बोलताना, शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले होते अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
