कुस्तीपटूंच्या दबावात क्रीडा मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली, 24 डिसेंबर (हिं.स.) : भारतीय क्रीडा मंत्रालयाने नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. काही खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने आज, रविवारी हा निर्णय घेतला. कुस्तीसंघाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाल्यानंतर काही कुस्तीपटूंनी रान उठवले होते. हा विरोध पाहता सरकारने नवनियुक्त कुस्ती संघ निलंबित केलाय.
ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनंतर बजरंग पुनिया यांनी पद्मश्री परत केला. तसेच हरियाणाचा पॅरा अॅथलीट वीरेंद्र सिंग याने पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा मंत्रालयाने नवनियुक्त कुस्तीसंघ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. कुस्ती संघटना निलंबित झाल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले की, हा योग्य निर्णय आहे. आमच्या बहिणींवर आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात संबंधित लोकांना पूर्णपणे हटवले पाहिजे. आमच्यावर अनेक आरोप झाले. आम्ही देशासाठी खेळतो आणि पदके मिळवतो. क्रीडापटू जातीभेद मानत नसून एका ताटलीत जेवत असल्याचे पुनिया यांनी सांगितले. क्रीडा संघटना खेळाडूंना मदत करण्यासाठी आहे, त्यांना त्रास देण्यासाठी नाही. आम्हाला निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रत्येक राज्यात आपले लोक उभे केले आहेत. आमचे सत्य दाखवले गेले नाही. आम्ही कुस्ती संघाशी संबंधित नव्हतो. आम्ही सरकारी लोकांनाही आम्हाला पाठिंबा मागितला त्यावेळी आम्हाला कोणीही साथ दिली नाही. आम्ही महिला खासदारांना पत्रेही लिहिली होती, पण आम्हाला कोणीही मदत केली नाही. परंतु, महिला कुस्तीपटूंनी हिम्मत दाखवत आपला विरोध कायम ठेवल्याचे पुनिया यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
