डब्लिन, 7 ऑगस्ट (हिं.स.)। परदेशात भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आल्याची प्रकरणं समोर आली होती.त्यानंतर आता आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवरही हल्ला करत भारतात निघून जा असं म्हणत धमकावलं. मारहाण करणारी मुलं ही अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.
माहितीनुसार, आयर्लंडमध्ये अल्पवयीन मुलांच्या एका गटाने भारतीय वंशाच्या सहा वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आणि भारतात परत जा असं म्हणत धमकावलं. वॉटरफोर्डमधील मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत असताना तिच्या घराबाहेर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोरांनी मुलीच्या गुप्तांगावर सायकलच्या चाकाने हल्ला केले. मुलीवर १२ ते १४ वयोगटातील मुलांनी हल्ला केल्याचे तिच्या आईने सांगितले. मुलीची आई आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे आणि नुकतीच ती आयर्लंडची नागरिक झाली आहे.
दरम्यान, मुलीवर हल्ला करणाऱ्या मुलांबद्दल आईने पोलिसांना माहिती दिली आहे. पण तिला त्यांना कोणतीही शिक्षा नको आहे. उलट तिने त्यांना समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन हवं आहे असं म्हटलं.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
