नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, मंगळवारी उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून हे उद्घाटन केले. सोबतच भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या ‘अमृत काल व्हिजन 2047’ चे अनावरणही त्यांनी केले. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.
या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी ‘अमृत काल व्हिजन 2047’ शी संबंधित 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले. देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मधे आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी सर्वांचे स्वागत केले. 2021 मध्ये शिखर परिषद झाली होती तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग कसे त्रस्त झाले होते याची आठवण करुन देत, एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे यावर त्यांनी भर दिला. बदलत्या जागतिक व्यवस्थेत जग भारताकडे नव्या आशेने पाहत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल असे ते म्हणाले. जागतिक व्यापारात सागरी मार्गांची भूमिका अधोरेखित करताना कोरोनानंतरच्या जगात विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळीच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.
भारताच्या सागरी क्षमतेचा जगाला नेहमीच फायदा झाला आहे यास इतिहास साक्षीदार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला बळकट करण्यासाठी उचललेल्या पद्धतशीर पावलांची यादीच पंतप्रधानांनी यावेळी सांगितली. प्रस्तावित भारत-मध्य पूर्व- युरोप आर्थिक कॉरिडॉरवरील ऐतिहासिक जी20 सहमतीचा परिवर्तनात्मक प्रभाव त्यांनी अधोरेखित केला. भूतकाळातील रेशीम मार्गाने (सिल्क रुट) अनेक देशांची अर्थव्यवस्था बदलली होती. त्याचप्रमाणे हा कॉरिडॉरही जागतिक व्यापाराचे चित्र बदलून टाकेल असे ते म्हणाले. नव्या पिढीचे भव्य बंदर (नेक्स्ट जनरेशन मेगा पोर्ट), आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्स-शिपमेंट बंदर, बेटांचा विकास, अंतर्देशीय जलमार्ग इनलँड आणि बहुआयामी केन्द्र याअंतर्गत व्यवसाय खर्चात कपात केली जाईल. तर पर्यावरणाचा ऱ्हास कमी झाल्यामुळे दळणवळण कार्यक्षमता सुधारेल आणि नोकऱ्या निर्माण होतील. या मोहिमेत सहभागी होत भारताशी हातमिळवणी करण्याची गुंतवणूकदारांना उत्तम संधी असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
आगामी 25 वर्षांत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजचा भारत काम करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला. सरकार प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या सागरी क्षेत्राला बळकट करण्यासाठी केलेल्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. गेल्या दशकात, भारतातील प्रमुख बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे आणि मोठ्या जहाजांचा बंदरातील कामाचा वेळ 2014 च्या 42 तासांच्या तुलनेत 24 तासांपेक्षा कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. बंदरांची संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी नवीन रस्त्यांच्या बांधकामाचा आणि किनारी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सागरमाला प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला. या प्रयत्नांमुळे रोजगाराच्या संधी आणि राहणीमान सुलभता अनेक पटींनी वाढत असल्याचे पंतप्रधानानी सांगितले.
पंतप्रधानांनी जहाज बांधणी आणि दुरुस्ती या क्षेत्राबद्दलचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन विशद केला. भारतीय बनावटीची युद्धनौका आय एन एस विक्रांत ही भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. येत्या दशकामध्ये भारत जहाजबांधणी क्षेत्रात जगातील पाच अव्वल देशांमधील एक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक मोठ्या उद्योजकांना सागरी क्षेत्रात आमंत्रित करण्यासाठी भारतात काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि अहमदाबादमधील गिफ्ट सिटीचा उल्लेख केला जिथे एकाच वेळी सवलत देताना आर्थिक सेवा म्हणून जहाज भाडेपट्टी सुरू केली आहे. जहाज भाड्याने देणाऱ्या चार जागतिक कंपन्यांनीही गिफ्ट आयएफएससीमध्ये नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
भारताला भव्य किनारपट्टी लाभली असून एक समर्थ अशी नद्यांशी समांतर पर्यावरण प्रणाली आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून त्याद्वारे सागरी पर्यटनासाठी अनेकोत्तम संधी उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतातील सुमारे 5 हजार वर्षे जुन्या लोथल डॉकयार्डचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की हे एक जागतिक वारसास्थळ असून त्याला ‘नौवहनाचे उगमस्थान’ असे संबोधले जाते. हा जागतिक वारसा जतन करण्यासाठी मुंबईजवळील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलही बांधले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आणि या केंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन केले.
हिंदुस्थान समाचार
