उत्तरप्रदेश एटीएसने आवळल्या जिहादींच्या मुसक्या
गोरखपूर: नेपाळमार्गे भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 3 जिहादी दहशतवाद्यांना उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी-एटीएस) आज, गुरुवारी अटक केलीय. अटक केलेल्यांमध्ये 2 पाकिस्तानी आणि एक काश्मिरी दहशतवाद्याचा समावेश आहे. ते तिघेही हिजबूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी असून आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करतात.
यासंदर्भात यूपी- एटीएसने दिलेल्या माहितीनुसार 2 पाकिस्तानी आणि एक काश्मिरी दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत होते. या तिघांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणही घेतले असून, भारतात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. काही दिवसांपूर्वीच युपी एटीएसला ही माहिती मिळाली होती. याबाबत एटीएसच्या गोरखपूर युनिटला माहिती देण्यात आली. यानंतर 3 एप्रिल रोजी एटीएसच्या गोरखपूर युनिटने नेपाळ भारत बॉर्डवरुन 3 आरोपींना अटक केली. मोहम्मद अल्ताफ भट, सय्यद गझनफर आणि नासिर अली अशी आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अल्ताफ भट हा रावळपिंडी, पाकिस्तानचा रहिवासी आहे, सय्यद गझनफर हा इस्लामाबाद, पाकिस्तानचा रहिवासी आहे, तर नासिर अली हा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरचा रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून एटीएसने 2 मोबाईल फोन, 2 मेमरी कार्ड, 3 पासपोर्ट, 7 डेबिट आणि क्रेडिट कार्ड, 3 आधार कार्ड, 2 विमान तिकिटे, पाकिस्तानी ड्रायव्हिंग लायसन्स, पाकिस्तानी राष्ट्रीय ओळखपत्र, परदेशी ओळखपत्र जप्त करण्यात आले. नेपाळ, बांगलादेश, भारत आणि अमेरिकेचे चलन जप्त करण्यात आले आहे.
