दारू घोटाळा प्रकरणी ईडीने भिलाईहून घेतले ताब्यात
भिलाई, 18 जुलै (हिं.स.) : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य याला आज, शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलीय. छत्तीसगडमधील दारू घोटाळा प्रकरणी आढळलेल्या नवीन पुराव्यांच्या आधारे चैतन्यला अटक करण्यात आलीय.
ईडीचे पथक आज सकाळी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भिलाई येथील निवासस्थानी पोहोचले . केली. बघेल यांचा मुलगा चैतन्य हा आपल्या वडिलांसोबतच भिलाई येथील निवासस्थान वास्तव्याला आहे. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ताब्यात घेतले आणि ते रायपूरला रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य बघेल यांचा वाढदिवसही आज आहे. कार्यकर्त्यांनी चैतन्य यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली होती, परंतु ईडीने आधीच कारवाई केली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले होते.
यापूर्वी भूपेश बघेल यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले की ईडीचे अधिकारी सकाळी 6.20 वाजता त्यांच्या घरी पोहोचले. भूपेश बघेल म्हणाले की जेव्हा जेव्हा अदानी प्रकरण उपस्थित केले जाईल तेव्हा मोदी आणि शहा ईडीची कारवाई करतात. भूपेश बघेल ना तुटणार ना झुकणार, आम्ही लढू. देशभरातील विरोधी नेत्यांवर अशी कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच विधानसभेत जाताना भूपेश बघेल म्हणाले की गेल्या वेळी माझ्या वाढदिवशी ईडी पाठवण्यात आली होती. यावेळी त्यांनी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ईडी पाठवली आहे. परंतु, भूपेश बघेल झुकणार आणि घाबरणार नाहीत. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बघेल यांनी आरोप केला की, एकीकडे बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत, लोकशाहीचे तुकडे केले जात आहेत. दुसरीकडे, विरोधकांना दाबण्यासाठी ईडी, आयटी, सीबीआय, डीआरआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
————————–
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी
