एनआयए चौकशीची करण्यात आली मागणी
नवी दिल्ली, 08 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी 5 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणाचा अहवाल ईडीने मुख्यालयात सादर केलाय. तसेच या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे (एनआयए) चौकशी करण्याची मागणी केलीय.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेशन घोटाळा प्रकरणी ईडीने मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्या घरी छापेमारी केली. यावेळी शेख याने कारवाई टाळण्यासाठी घराला कुलुप लावून पळ काढला. ईडीचे अधिकाऱ्यांनी त्याला वारंवार फोन करूनही शेखने त्यांचे फोन घेतले नाहीत. अशात अचानकपणे सुमारे एक हजार तृणमूल समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच ईडीच्या पथकावर हल्ला चढवला. यात ईडीचे 3 अधिकारी जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. या घटनेनंतर शहाजहान शेखच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांवर चोरीचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यासंपूर्ण घटनाक्रमानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी 2 पानांचा अहवाल मुख्यालयात पाठवला आहे. या अहवालात कारवाईच्या प्रत्येक मिनिटाला झालेला घटनाक्रम नमूद करण्यात आलाय. तसेच या घटनेचा व्हिडीओ आणि माध्यमातील बातम्याची कात्रणे देखील अहवालासोबत जोडण्यात आली आहेत. घटनेच्या दिवशी पश्चिम बंगाल पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. तसेच ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर राज्य पोलिस दुचाकीवर बसून पळून गेल्याचा उल्लेख देखील ईडीच्या अहवालात करण्यात आलाय.
हिंदुस्थान समाचार
