नागपुरातील महामेळाव्यात आदिवासींची मागणी
नागपूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : आदिवासींमधील अनेक समूह आणि जाती ख्रिश्चन तसेच मुस्लिम झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ जाती नुसार ओबीसी व अनुसूचित जातीच्या सवलती मिळत आहे. त्या बंद करण्यात याव्या अशी एकमुखी मागणी जनजाती सुरक्षा मंचतर्फे आयोजित डि-लिस्टिंग महामेळाव्यात करण्यात आली. स्थानिक ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आज, मंगळवारी हा महामेळावा पार पडला.
या महामेळाव्यात संपूर्ण विदर्भातून 40 हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधव उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने गोंड, माडिया, कोलाम, भिल, भिलाला, कवर, आंध, नाईकडा, कोरकु, पारधी, निहाल, पारवा, गोवारी, परधान जनजाती समाजाची उल्लेखनीय उपस्थिती होती. नागपूर शहरातील 35 हजार घरांमधून या मेळाव्याकरिता आलेल्या आपल्या आदिवासी बंधूंना फूड पॅकेट्स तसेच पाण्याची बाटली देण्यात आली. नागपुरातील सी.पी. एण्ड बेरार मैदान येथून सकाळी 10 वाजता आदिवासी रॅलीला सुरुवात झाली. गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर सर्व आदिवासी ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालय येथे बांधलेल्या भव्य मंडपामध्ये आले. तिथे एकमुखाने डी- लिस्टिंगची मागणी केली.
आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण, उज्ज्वल, संस्कृति, रूढ़ी, प्रथा, परंपरेचे पालन न करणाऱ्या आणि आदिवासी देव पूजापद्धती, देवकार्य, सण उत्सव यांचा त्याग करून परधर्मात गेलेल्या आदिवासी व्यक्तीला वा समुहाला अनुसूचित जमातीच्या यादीतून हटवण्यात यावे, मूळ आदिवासिंसाठी असणाऱ्या सोयी, सुविधा, व आरक्षणाचा दुहेरी लाभ धर्मांतरित आदिवासिना मिळु नये व वरील बाबींसाठी अनुसूचित जमाती संशोधन अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या आदिवासी समाजाने केल्या आहेत. या सभेला माजी लोकसभा उपाध्यक्ष पद्मभूषण करिया मुंडा तसेच तिरखेडी आश्रमाचे ज्ञानिदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. गोधाडी येथील यसेश्वरा नंद सरस्वती महाराज, दाभाडी येथील आयुर्वेदाचार्य देवानंद पेंदोर महाराज, गोंदियाचे सेवकराम टेकाम महाराज, गडचिरोलीचे शंकर नैताम महाराज, वरखेडचे माधव दास महाराज आदींचे यावेळी मार्गदर्शन लाभले.
हिंदुस्थान समाचार
