दिसपूर, 08 जानेवारी (हिं.स.) : अयोध्येत आगामी 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात मूर्तिंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर आसाम सरकारने 22 जानेवारीचा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून घोषित केला आहे. म्हणजेच, या दिवशी राज्यात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. संपूर्ण राज्यात 22 जानेवारीला दारूविक्रीसाठी बंदी असेल. आसामचे पर्यटन मंत्री जयंत मल्ल बरुआ यांनी संदर्भात माहिती दिली.
पर्यटन मंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्यात ड्राय-डे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि 6 हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. सरकार एखादा विशेष सण किंवा विशेष प्रसंगी संपूर्ण राज्यात दारुविक्रीवर बंदी घालते, तेव्हा त्या दिवसाला ड्राय डे असे म्हणतात. ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असते. महत्त्वाचे म्हणजे, हा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई केली जाते. पंजाबच्या उत्पादन शुल्क कायद्यात 1962 मध्ये पहिल्यांदा ड्राय डेचा उल्लेख करण्यात आला होता. नंतर केंद्र सरकारने 1950 मध्ये संपूर्ण भारतात लागू केला होता.
हिंदुस्थान समाचार
