ढाका, 8 जानेवारी (हिं.स.) – बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या पाचव्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोध पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाला 300 पैकी 200 जागांवर विजय मिळाला. तर शेख हसीना स्वत: 2 लाख 49 हजार 965 मतांनी विजय मिळवला आहे. 2009 पासून बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या.
या व्यतिरिक्त बांग्लादेश राष्ट्रीय पक्षाचे 4, बांग्लादेश जातीय पार्टीचे 10, तर 62 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. शेख हसीना त्यांचा लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-3 मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना तब्बल 2 लाख 50 हजार मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एम. निजामउद्दीन लष्कर यांना अवघी 469 मते मिळाली. शेख हसीना 1986 पासून आठव्यांदा गोपालगंज-3 मधून निवडणूक जिंकल्या आहेत. दरम्यान, शेख हसीना बांग्लादेशमध्ये सर्वाधिक काळापासून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड केला आहे.
2018 मध्ये बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत विक्रमी 80 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. परिणामी निवडणुकीत केवळ 40 टक्के मतदान झाले. त्याचवेळी अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर यांनी दावा केला की, लोकांनी मतदानाद्वारे बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचा बहिष्कार नाकारला.
हिंदुस्थान समाचार
