तामिळनाडूसह पाच राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा कोलंबो, 28 नोव्हेंबर (हिं.स.)।श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण बेपत्ता आहेत. बचाव पथके सतत मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. श्रीलंकेत हाहाकार माजवल्यानंतर आता हा भीषण चक्रीवादळ हळूहळू भारताच्या दिशेने सरकत आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील 12 तासांत वादळ पुढे सरकत असताना आणखी तीव्र होऊ शकते. या चक्रीवादळ ‘दितवाह’ने श्रीलंकेच्या पूर्व आणि मध्य भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर (डीएमसी) ने आपल्या निवेदनात सांगितले की देशभरातील 43,991 लोकांना शाळा आणि इतर सार्वजनिक निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले आहे. या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा निलंबित करण्यात आलेली आहे आणि मुसळधार पावसामुळे कोलंबो स्टॉक एक्स्चेंजनेही व्यवहार लवकर बंद करण्याची घोषणा केली. डीएमसी चे इमर्जन्सी ऑपरेशन्स संचालक ब्रिगेडियर एस. धर्मविक्रमा यांनी सांगितले, “आम्ही सर्वाधिक प्रभावित भागांमध्ये बचावकार्य सुरू ठेवले आहे, पण काही गावांपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे कारण भूस्खलनामुळे रस्ते बंद आहेत. आम्ही सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत.” बंदरं आणि नागरी विमान वाहतूक मंत्री अनुरा करुणातिलके यांनी सांगितले की परिस्थिती आणखी बिकट झाल्यास श्रीलंका आपल्या मुख्य विमानतळावरील उड्डाणे दक्षिण भारतातील तिरुवनंतपुरम् किंवा कोची विमानतळाकडे वळवू शकते. स्थानिक माध्यमांच्या मते मस्कत, दुबई, नवी दिल्ली आणि बँकॉकसह सहा उड्डाणे कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आधीच वळवण्यात आली होती.टीआयएएल ने सांगितले की श्रीलंकेकडे जाणारी पाच उड्डाणे (ज्यापैकी तीन मध्य-पूर्व प्रदेशातून आणि एक-एक मलेशिया व भारतातून होती) शुक्रवारी कोलंबोतील खराब हवामानामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे धोकादायक वादळ श्रीलंकेतून आता भारताच्या दिशेने येत आहे. याबाबत हवामान विभागाने प्री-सायक्लोन अलर्ट जारी केला आहे. विभागाने सांगितले की चक्रीवादळाचा मार्ग उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनाऱ्यांकडे आहे. या भागांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत हवामान अतिशय खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारी भागातील मच्छिमारांना सतर्क करण्यात आले आहे. —————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
