वॉशिंग्टन , 23 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या टेक्सास राज्यात उभारण्यात आलेल्या 90 फूट उंच भगवान हनुमानाच्या मूर्तीवरून वाद निर्माण झाला आहे. टेक्सासमधील रिपब्लिकन नेते अलेक्झांडर डंकन यांनी या मूर्तीवर आक्षेप घेत म्हणाले की, अमेरिका हे एक ख्रिस्ती राष्ट्र आहे आणि येथे “खोट्या देवतांची मूर्ती” असण्याचं काहीही कारण नाही.
डंकन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर या मूर्तीचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “आपण टेक्सासमध्ये एका खोट्या हिंदू देवाची मूर्ती का उभारतो आहोत? आपण एक ख्रिश्चन राष्ट्र आहोत.” डंकन हे सेनेट निवडणुकीसाठी उमेदवारी करत असून, डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाशी संबंधित आहेत. त्यांनी पुढे बायबलचा दाखला देत असंही म्हटलं, “तू माझ्याशिवाय कोणत्याही देवाची पूजा करू नकोस. तू स्वतःसाठी कोणतीही प्रतिमा बनवू नकोस, आकाशात, पृथ्वीवर किंवा समुद्रात असलेल्या कोणत्याही गोष्टीची प्रतिमा बनवू नकोस.”
डंकन यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला. हिंदू अमेरिकन फाउंडेशन (एचएएफ) ने त्यांच्या विधानाला हिंदू-विरोधी आणि भडकावू ठरवत रिपब्लिकन पक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. फाउंडेशनने प्रश्न विचारला की, टेक्सास जिओपी (रिपब्लिकन पार्टी) आपल्या उमेदवारावर कारवाई करणार का, जो उघडपणे द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे आणि अमेरिकेच्या संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीचे (धार्मिक स्वातंत्र्य) अपमान करत आहे?
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रिपब्लिकन नेत्याला आठवण करून दिली की, अमेरिकेचे संविधान सर्व धर्म मानण्याची आणि त्यांचे पालन करण्याची पूर्ण स्वातंत्र्य देतं. युजर जॉर्डन क्राउडर यांनी लिहिलं, “फक्त तुम्ही हिंदू नाही आहात म्हणून तो धर्म खोटा ठरत नाही. वेद हे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सुमारे 2000 वर्षे आधी लिहिले गेले होते आणि ते अत्यंत विलक्षण ग्रंथ आहेत. या ग्रंथांचा प्रभाव ख्रिस्ती धर्मावरही दिसतो, त्यामुळे तुम्ही त्या धर्माचा आदर केला पाहिजे ज्याने तुमच्या धर्मालाही प्रभाव दिला आहे.
वर्ष 2024 मध्ये अनावरण करण्यात आलेली ही मूर्ती ‘स्टॅच्यू ऑफ यूनियन’ या नावाने ओळखली जाते. ही मूर्ती श्री चिन्जीयार स्वामीजींच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे आणि ही अमेरिका मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे. ही भव्य मूर्ती टेक्सासमधील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात (शुगरलँड) स्थापित करण्यात आली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
