मुंबई, १४ ऑक्टोबर : मराठीतील आघाडीचा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा नवीन वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाचे पोस्टर न्युयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच या सिनेमाने इतिहास रचला आहे.
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करत असून येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीच्या वतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला.
दिग्पाल लांजेकर याने ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाची घोषणा करताना एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा त्याने लिहिलं होतं, उजळला तेजाने, पुरंदराचा माथा..सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा..शत्रू होई परास्त, असा ज्याचा गमिनी कावा..शिवरायांचा अवतार जणू..अवतरला ‘शिवरायांचा छावा. दिग्पाल लांजेकरचे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ हे सिनेमे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीला पडले आहेत.
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याशिवाय विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
