नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर : युद्धग्रस्त इस्राइलमधून ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २३५ भारतीयांची दुसरी खेप शनिवारी सकाळी दिल्लीत पोहोचली. यामध्ये दोन अर्भकांचा समावेश आहे. याआधी २१२ भारतीयांचा पहिला गट शुक्रवारी सकाळी भारतात पोहोचला होता.
इस्राइल आणि हमास यांच्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी इस्त्राइलमधून भारताकडे निघालेल्या नागरिकांमध्ये २३५ भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. विमानाने तेल अवीव येथून रात्री ११.०२ वाजता उड्डाण केले. दरम्यान दूतावासाने तिसर्या चमूमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना ई-मेलद्वारे कळवले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी लोकांना पुन्हा मेसेज केला जाईल.
