भंडारा भंडारा जिल्हयाच्या तुमसर शहरातील गांधी सागर तलावाच्या पाळीजवळील एका झाडाखाली गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ९३८ ग्राम गांजा जप्त करण्यात आला. संदीप धुर्वे (४४), जितेश कारेमोरे (३९) यांना अटक केली आहे.
तुमसर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक फौजदार धर्मेंद्र बोरकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह गांधी सागर तलावाच्या पाळीजवळील एका झाडाच्या खाली दोघेजण गांजा विक्री करीत असल्याचे माहिती मिळाली. पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन झडती घेतली असता सोबत असलेल्या बॅगमध्ये ९३८ ग्राम गांजा आढळून आला. तुमसर शहरात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे फोफावले असून गांजा विक्रीला सुद्धा वेग आला आहे. अनेक तरुण गांजा सेवनाच्या आहारी गेले आहेत. तुमसर शहरात लगतच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याचे बोलले जाते. पोलिसांच्या या कारवाईमुळे गांजा तस्करांचे तसेच व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
