नाशिक, ११ नोव्हेंबर, (हिं.स.) : जुने नाशिक येथे दोन ठिकाणी विनापरवाना फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पहिल्या घटनेत संशयित जावेद सुलतान मिर्झा (वय ७५, रा. बागवानपुरा) व नितीन सीताराम कस्तुरे (वय ४०, रा. पुजारी गल्ली, काळाराम मंदिराजवळ) हे दोघे जण सहेली कलेक्शनसमोर व रुबी जनरल स्टोअर्सच्या बाजूला लोणार गल्लीत विनापरवाना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा रीतीने ज्वालाग्राही व स्फोटक फटाक्यांची विक्री करीत असताना मिळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक जुंद्रे यांच्या फिर्यादीनुसार मिर्झा व कस्तुरे यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
तर, दुसऱ्या घटनेत पोलीस हवालदार विखे यांनी म्हटले, की संशयित दीपिका ऋषिकेश भांगरे (वय २४, रा. मधली होळी, भद्रकाली, नाशिक) ही सरस्वती चौकातील राजधानी मॉलसमोर विनापरवाना गर्दीच्या ठिकाणी ज्वालाग्राही व स्फोटक स्वरूपाच्या फटाक्यांची विक्री करताना मिळून आले. भांगरेविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
