नाशिक, ७ नोव्हेंबर, : प्रीपेड टास्कच्या नावाखाली वेगवेगळ्या माध्यमांतून एका तरुणीस अज्ञात मोबाईलधारकाने सव्वानऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी तरुणी मूळची देवळाली कॅम्पची असून, सध्या ती गोरेगाव (मुंबई) येथे राहते. ही तरुणी देवळाली कॅम्प येथे आली असताना अज्ञात मोबाईलधारकाने तिला प्रीपेड
टास्कच्या नावाखाली पैसे कमावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन वेगवेगळ्या माध्यमांतून एकूण ९ लाख २८ हजार ५२० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.
