नाशिक, २६ जानेवारी : एका तरुणाच्या नावाने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून त्याआधारे एक लाखाचे कर्ज मंजूर करून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी हिमांशू अशोक मिश्रा (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) याने फिर्यादी रोहित रमेश पगार (वय ३७, रा. मेघा पार्क, बेळे कॉलनी, नाशिक) यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले.त्यानंतरहे कार्ड आरोपी हिमांशू मिश्रा याने त्र्यंबक नाका सिग्नल येथील टाटा कॅपिटल फायनान्स सर्व्हिसेसमध्ये सादर केले; मात्र या कागदपत्रांची पूर्ण शहानिशा न करता १ लाख ३ हजार ६९३ रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर आरोपी मिश्रा व टाटा कॅपिटल फायनान्स यांनी संगनमताने फिर्यादी पगार यांची फसवणूक करून त्यांची बँकिंग क्षेत्रातील क्रेडिट खराब केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात हिमांशू मिश्रा व फायनान्स सर्व्हिसविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
