रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अनुषंगाने धडक कारवाई करून मोठा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.
गेल्या १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीती आचारसंहिता लागू झाली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यकक्षेत अवैध दारूविरोधी एकूण १११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ लाख ४२ हजार ६७८ रुपये किमतीची एक हजार ४७ लिटर हातभट्टीची दारू, ७३.४८ लिटर विदेशी बनावटीची दारू, ४२.४८ लिटर देशी बनावटीची दारू तसेच रसायन जप्त करण्यात आले. जिल्ह्यात अमली पदार्थ जप्तीच्या २ कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये ४ किलो २९४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी एकूण ४२९ व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच २ हजार ९६९ व्यक्तींना आपली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून जिल्हयातील एकूण दोन हजार ५५९ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २१२ शस्त्र परवानाधारक मृत किंवा वयोवृद्ध असल्याने ते रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
