भंडारा, ३ नोव्हेंबर, (हिं. स.) : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला. तर आज आमदारांचा निषेध करत काळ्या फिती लावुन नारेबाजी केली आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजु कारेमोरे यांची कारकीर्द नेहमी चर्चेत राहिली आहे. तुमसर पोलिस ठाण्यात जाऊन केलेली शिवीगाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च शब्दात केलेली दमदाटी या प्रकारानंतर तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा आणखी प्रकार पुढे आला आहे. यात ते एका शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. या विरोधात तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करत आमदार राजू कारेमोरे यांचा निषेध व्यक्त केला आहे.
जिल्हा चिकित्सक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेण्याकरिता २८ ऑक्टोबरला आले होते. या बैठकीत महिला परीचारिकेला जाब विचारताना कारेमोरे यांनी शिव्यांचा भडीमार केला. इतकेच नव्हे तर कक्षसेवक भरत मानकर यांना दोनदा मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर यांची तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे या घटनेची तक्रार दाखल केली. तर आज काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. जो पर्यंत आमदार माफी मागणार नाही तो पर्यंत निषेध करत राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगीतले आहे.
तर या संदर्भातील आमदार यांना विचारणा केली असताना आमदारांनी सांगितले की, तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रेफर टू भंडारा केला जातो. रुग्णांना सेवा दिली जात नाही. या संदर्भात विचारणा केली आहे. कुठलेही अपशब्द वापरले नाही.
आमदार कारेमोरे यांची कारकिर्दी नेहमी वादग्रस्त राहिली असून आता काय कारवाई होते ते पाहण्यासारखे असेल.
हिंदुस्थान समाचार
