जळगाव, 1 फेब्रुवारी : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना मोहाडी रोड परिसरातील शिवशंभू नगरात उघडकीस आली. चोरट्यांनी रोकडसह देवघरातील चांदीची मुर्ती असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवशंभू नगरात केशव आनंद चव्हाण हे वास्तव्यास असून ते एका खासगी कंपनीत चालक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या शालकाचे लग्न असल्याने ते सहकुटुंब चाळीसगाव येथे गेले होते. तेव्हापासून त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी अस्ताव्यस्त सामान फेकला, कपाटात ठेवलेली रोकड आणि चांदीचे दागिन्यांसह देवघरातील देवीची मुर्ती चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी केशव चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
