अमरावती अमरावती लोकसभेत प्रथमतः कमळ चिन्ह इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर झळकणार आहे. भाजपने युती मध्ये असणाऱ्या पक्षासाठीच अमरावती लोकसभा मतदारसंघात मतं मागितली. स्वतःच्या पक्षासाठी कधीच भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघात मतं मागितली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच भाजप निवडणूक लढवत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, मोदीजी यांना पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करण्यासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपला निवडून आणा, असे आवाहन भाजपचे राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केले. बोंडे यांच्या पुढाकाराने चांदुर बाजार येथे महायुतीच्या उमेदवार नवनित रवी राणा यांच्या प्रचारासाठी मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या जाहीर सभेत चांदुर बाजार शहर व तालुक्याचे ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुन्हा आशिर्वाद द्यावा, ही नम्र विनंती – नवनित राणा
चांदुर बाजार येथे महायुतीची भाजप उमेदवार नवनित रवी राणा यांनी या जाहीर सभेत सांगितले की,अमित शहा यांचे अमरावतीवर पुर्ण लक्ष आहे. आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे अमरावतीवर खूप प्रेम आहे. 2014 ला मोदींजीची लाट होती. तसेच 2019 ला देखील लाट असताना भाजपने इतर पक्षासाठी मत मागितले. यंदा आपल्या सर्वांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे की, कमळ चिन्हाला मतदान करुन देशाच्या विकासासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा. अशी आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे. नवनित रवी राणा उमेदवार नाही तर स्वतः देशाचे लाडके व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपण मतदान करणार आहे. असे निश्चित करा. ऐवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. युक्रेन मध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील हजारो विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. राष्ट्राच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व देणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी मला एक सून म्हणून 2019 मध्ये निवडून आणले. आज मी काही पक्षाला जड वाटत आहे. पांच वर्षात प्रत्येक गावागावात खेड्यापाड्यात आपला जनसंपर्क ठेवला आहे. अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी मी मेघा टेक्सटाईल पार्क खेचून आणले. विमानतळ कित्येक वर्षांपासून रखडलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्याने आज बेलोरा विमानतळावरून लवकरच विमान वाहतूक सुरू होणार आहे.
