नाशिक, १४ डिसेंबर, (हिं.स.) : जिओ कस्टमर केअरकडून बोलत असल्याचे भासवून मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल करण्यास सांगून वृद्धेच्या बँक खात्यातील सव्वापाच लाखांची रोकड परस्पर काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ६६ वर्षीय फिर्यादी महिला ही नाशिकरोड येथील धोंगडेनगर येथे राहते. या महिलेला १८ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास एका भामट्याने ९३३०५२१४८८ व ६२९५१४२८३३ या व्हॉट्सऍप क्रमांकांवरून महिलेशी संपर्क साधला. जिओ कस्टमर केअरकडून बोलत असल्याचे संशयिताने भासविले. त्यानंतर महिलेला व्हॉट्सऍप क्रमांकावरून एक ऍप्लिकेशन पाठविले. ते फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगून त्याआधारे संशयिताने फिर्यादी महिलेच्या बँक खात्यातून ५ लाख ३५ हजार ७०० रुपयांची रक्कम त्यांच्या संमतीशिवाय काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार अवघ्या दोन तासांत घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
