नागपूर, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे सिंह आल्याचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून खोटा व्हिडीओ तयार करून अफवा पसरवणाऱ्या तरुणाला वनविभागाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलेय.
यासंदर्भातील माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरअंतर्गत उपवनक्षेत्र आदासामधील मोहपा बिटातील मौजा बुधला या गावाच्या चौरस्त्यावर प्रताप मडावी याने मी सिंह पाहिला आणि त्याचा व्हिडिओ तयार केला असे वनखात्याला कळवले. एवढेच नाही तर कृत्रिम बुद्धीमता वापरुन तयार केलेला व्हिडिओ त्याने समाजमाध्यमावर प्रसारित केला. वनपरिक्षेत्र अधिकारी कळमेश्वर व क्षेत्रसहाय्यक व वनरक्षक यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत चौकशी केली असता या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे आढळून आले. सिंह पाहिल्याची खोटी अफवा पसरवल्यामुळे कळमेश्वर येथील प्रताप मडावी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील चौकशी व कार्यवाहीकरिता कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आले. अशा प्रकारचे बनावट व्हिडिओ व्हायरल करुन जनसामान्यात भीतीचे वातावरण पसरवू नये असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा व विभागीय वनाधिकारी पी. जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूरकर, क्षेत्र सहाय्यक के. एम. जामगडे, बिटरक्षक पी. एन. वावधने, जी. आर. मानकर, जी. जी. मेंढे, पी. यू. पाटील यांनी पार पाडली.
हिंदुस्थान समाचार
