पुणे, 19 फेब्रुवारी : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त केले आहे. तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल साडेतीन कोटीचे मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज हस्तगत केले आहे.त्यांच्या परदेशी साथीदारांच्या मागावर गुन्हे शाखेची सहा पथके रवाना झाली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. अमंली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यानंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
वैभव उर्फ पिंट्या भारत माने(रा.पुणे), अजय अमरनाथ करोसिया(३५, रा.पुणे) आणि हैदर शेख (रा.विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात माहिती देताना अशा अंमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे खोदुन काढणार असल्याचा इशारात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. यावेळी सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त(गुन्हे) सुनिल तांबे आणि सतिश गोवेकर उपस्थित होते. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना सोमवार पेठेत एका इर्टिगा गाडीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा गाडीचालकासह मेफेड्रॉन ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी आल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
