रत्नागिरी, 31 ऑक्टोबर, (हिं. स.) : बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला देण्यासाठी कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक शैलेश आत्माराम रेवाळे (वय ३८ वर्षे) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंधरा हजाराची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या मालकांच्या बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला मिळण्याकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी आणि त्याबाबतचे कामकाज पूर्ण करून ना हरकत दाखला देण्यासाठी शैलेश रेवाळे याने गेल्या २६ ऑक्टोबर रोजी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ती पंचांसमक्ष स्वीकारताना आज त्याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस नाईक दीपक आंबेकर, हेमंत पवार यांनी ही कारवाई केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खासगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाचा फोन नं. (02352) 222893, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपअधीक्षक सुशांत चव्हाण (9823233044), पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला (7774097874), पोलीस निरीक्षक अनंत कांबळे (7507417072) किंवा टोल फ्री क्रमांक 1064 येथे संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन उपअधीक्षक श्री. चव्हाण यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
