परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील चांदज शिवारात गुप्तधन शोधणारी आठ जणांची टोळी बोरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली.
बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदज शिवारात एका शेतात तंत्र आणि मंत्राचा वापर करीत आठ जणांच्या एका टोळीने मोठा खड्डा खोदण्याचा प्रयत्न सुरु केला. तत्पूर्वी त्या ठिकाणी पूजाअर्चासुध्दा केली व गुप्तधनाच्या शोधाकरीता या टोळीने खड्डा खोल करण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा बोरी पोलिसांना त्या संबंधिची माहिती कळाली. पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खड्डा खोदणार्या आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात जादूटोनासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास सुरु केला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
