नाशिक, २ जानेवारी, (हिं.स) – साडीच्या फॉलची मागणी करून धारदार हत्याराने वार करून दुकानातील महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याची घटना सामनगाव येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी समाधान दादा जगताप (रा. नवीन सामनगाव, ता. जि. नाशिक) यांच्या पत्नी शकुंतला जगताप या सामनगाव येथे सर्वेश्वर स्टोअर या दुकानात होत्या. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून एक इसम आला व त्याने साडीच्या फॉलची मागणी केली. फॉल दाखवीत असताना या अज्ञात इसमाने शकुंतला जगताप यांच्यावर धारदार हत्याराने वार करून दुखापत केली. तसेच त्यांच्या अंगावर असलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
