नाशिक, 23 ऑक्टोबर(हिं.स.) : शहर परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी अज्ञात कारणांतून तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.
आत्महत्येचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. गणेश राजू सर्जेराव (वय २७, रा. पुष्पकनगर, म्हसरूळ, नाशिक) याने काल (दि. २२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कणसरा माता चौक येथील मोकळ्या प्लॉटवर असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.
आत्महत्येचा दुसरा प्रकार माडसांगवी येथे घडला. सुरेश किसन पेटारे (वय ४५, रा. भवानीचा मळा, शिंगाडे वस्ती, माडसांगवी) यांनी राहत्या घरातील पत्र्याच्या गोल लोखंडी पाईपाला नायलॉन साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती रघुनाथ सुकदेव गोडसे यांनी आडगाव पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार देसाई करीत आहेत.
आत्महत्येचा तिसरा प्रकार रोकडोबावाडीत घडला. याबाबत नंदू समाधान सोमवंशी (रा. काकडे गल्ली, देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की सोमवंशी यांचे मेहुणे अशोक दामू सुरवाडे (वय ५२, रा. फुले मळा, रोकडोबावाडी, देवळाली गाव) यांनी काल (दि. २२) दुपारी साडेबारा वाजेच्या पूर्वी राहत्या घरातील किचनमध्ये असलेल्या छताच्या लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सातभाई करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
