अमरावती, 20 फेब्रुवारी (हिं.स.)।
तिवसा तालुक्यातील भारवाडी–वर्धा पुलाजवळील IRB कंपनीच्या ट्रक ले-बाय परिसरात चाकूने भोसकून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना तिवसा तालुका अंतर्गत येणाऱ्या तिवसा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे आढळून आले असून, चाकूने वार करून संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, हत्या नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, हत्या वैयक्तिक वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून लवकरच घटनेचा उलगडा करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
