नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
गोवर्धन (ता. नाशिक) ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तुफान हाणामारी होऊन पोलिस ठाण्यात 3 परस्परांविरोधात तक्रारी देण्यात आल्या. जाधव नामक ग्रामस्थाची ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या – जवळपास २५० कुटुंबाना पुढे करून हा व ग्रामस्थ दहशत माजवित असल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी (दि. २१) आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेतही संबंधिताने अशाच पध्दतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ध्वनिक्षेपकाचा ताबा घेण्यात आल्याने सरपंचाचे समर्थक तसेच जाधव यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी समर्थकांनी जाधव यास चांगलाच चोप दिला.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रारी देण्यात आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जाधव याने सरपंचाशी वाद घालून त्याच्या कानशिलात लगावली होती. यावरून सरपंचाचे नातेवाईक संतप्त झाले होते. जाधव यास धडा शिकविण्यासाठी संधीच्या शोधातही होते. ग्रामसभेच्या निमित्ताने हा वचपा काढण्यात आल्याचे बोलले जाते
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
