जळगाव, 6 जानेवारी (हिं.स.) : महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील टॉवर चौकात घडली . याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुलोचना काशिनाथ चौधरी (वय-६६) रा.कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर या महिला कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात खरेदी करण्यासाठी आलेल्या होत्या. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात मधील एका दुकानासमोर उभे असताना त्यांच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण ६३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत सुलोचना चौधरी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
