छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर 12 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गणोरकर, अशी परिवहन अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते आरटीओ कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. परिवहन विभागाच्या आयुक्तांनी या दोघांचे तात्काळ निलंबनही केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
ट्रक चालक आणि दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. अपघात होताच आरटीओ अधिकारी त्या ठिकाणाहून पळून गेले होते. नंतर त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळतं आहे. प्राथमिक तपासात हा अपघात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे झाल्याची माहिती समोर आली. अधिक तपास प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे करीत आहेत.
शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलानींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला. समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
